शाळेचा इतिहास

शाळेचा इतिहास :

5 ऑक्टोबर, 1946 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर जेलरोडवरील रामबाग येथे एका गॅरेजमध्ये श्री जयरामभाई प्राथमिक शाळेचा श्रीगणेशा अवघ्या चार विद्यार्थ्यांच्या सहाय्याने करण्यात आला. ही सुरवातीची शारदा विद्या प्रसारक संस्थेची शारदा विद्यामंदिर होय.

त्यानंतर आपल्या मुलाच्या शालेय प्रवेशासाठी आलेल्या श्री जयरामभाईंनी शाळेची अवस्था बघून बिटको टॉकिज चा एक भाग शाळेस विनामूल्य वापरण्यास दिला. शारदा विद्या मंदिर पत्र्याच्या शेडमधून बिटको टॉकिजमध्ये आली. त्यानंतर शाळेचा व्याप वाढू लागला. पुन्हा एकदा श्री जयरामभाईंनी आश टॉकिजजवळच्या चार खोल्या विनामूल्य वापरण्यास दिल्या. शारदा विद्या मंदिराचे काही वर्ग तिकडे गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शाळेची वाटचाल सुरूच होती.

शाळेची स्थापना :

1950 साली गांधीनगर येथे कॉंग्रेसचे 56 वे अधिवेशन भरले होते. त्याठिकाणी पंडित नेहरूंसह कॉंग्रेसमधील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन श्री जयरामभाई  यांनी त्यावेळचे दळणवळण मंत्री श्री जगजीवनराम यांच्या हस्ते सोमवार दि. 18/09/1950 रोजी शारदा मंदिराच्या नव्या इमारतीचा कोनशीला समारंभ करवून घेतला. पुढील दोन वर्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले व श्री भाऊसाहेब हिरे यांच्या हस्ते 04/01/1953 रोजी इमारतीचे उद्घाटन झाले. या नूतन वास्तूत विद्यालय स्थलांतरीत झाले. या इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर शारदा विद्यालयाचे नामांतर श्री जयरामभाई विद्यामंदिर असे करण्यात आले.

1953 मध्ये इ. 8 वी चा वर्ग सुरू झाला. 1954 मध्ये 8 वी 2 वर्ग व 9 वी 1 वर्ग सुरू झाला. 1955 मध्ये इ. 10 वी ला जून 1956 मध्ये इ. 11 वी ला मान्यता मिळाली व श्री जयरामभाई हायस्कूल हे पूर्ण हायस्कूल बनले.

शाळेचे देणगीदार : श्री जयरामभाई डायाभाई चौहाण